Monday 15 October 2012

'तो' आणि 'ती'


एक ती...
स्वतःवर प्रेम करणारी..स्वतःच्या सुंदरतेचा हेवा असणारी
स्वतःच्या बुद्धिमत्तेची चांगली जाण असणारी
या जगात तीच सर्वात जास्त प्रेम स्वतःवर होतं.....जितकं प्रेम स्वतःवर ती करायची तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम इतरांनी केलं असेल तिच्यावर
अनेक जण तिच्या आयुष्यात आले....काहींनी तिच्या गुणांवर स्तुतीकवन केली तर काही तिच्या रुपावर भाळले...
पण त्यातल्या एकाचाही प्रभाव तिच्यावर पडत नव्हता....
स्वतःच्या चांगल्या गोष्टींचा माज नव्हता खरंतर तिला..पण हळू हळू एक गुर्मी येत गेली तिच्या स्वभावात....
तिच्या तोडीस तोड कोणी मिळेल असा कधी वाटलं नव्हता तिला आणि म्हणून च स्वतःचं अस्तित्व तिला अजून प्यार वाटू लागलं...
येणाया प्रत्येक proposal मधले काही न काही दोष काढून ती प्रत्येकाला नाकारत होती...गर्वाबरोबर स्वतःच वय ही वाढतंय याकडे दुर्लक्ष होतं होत तिचं...
जसं तिला बनवलं तसं देवाने नक्कीच कोणाला तरी बनवलं असणार पण माणूस कितीही चांगला असला तरी देवासमोर तुच्छ चं हे ती अहंकारात विसरून गेली... 


एक तो...
राजबिंडा नसला तरी देखणा नक्कीच होता तो....
इतर पुरुषांना मत्सर वाटावा आणि स्त्रियांना लोभ असं त्याचं रूप होतं...
जोडीला श्रीमंतीही लाभली होती...व्यक्तीमत्वात कसलीच कमरतता नव्हती...
चारचौघात आपलं वेगळेपण सिद्ध करायची सवय कदाचित यातूनच लागली असावी त्याला....
कायम हुशारी च्या जोरावर सर्वांची मन जिंकत असे तो...
हातात पैसा खुळखुळत असला तरी वाईट सवयींच्या आहारी तो कधीच नव्हता गेला...
मात्र आपल्याला शोभेल अशी परिपूर्ण जोडीदार लाभेल असा त्याला कदाचित वाटत नव्हतं..
आलेल्या प्रत्येक मुलीला पारखून तिची परीक्षा करून नाही म्हणण्यातच त्याचे दिवस जात होते..

आणि एक दिवस त्या दोघांची भेट झाली..कोणी ओळखीच्या आत्याकडून त्यांना एकमेकांचं स्थळ आलेलं...
नाही म्हणायला एकही दोष नाही म्हणून लग्न लावून दिलं घरच्यांनी..
पण लग्न झालं म्हणजे जीवनाची इतिकर्तव्यता संपली असं होत नसतं...उलट इथंच तर सगळं सुरु होतं...
पहिल्याच भेटीत नजरा नजर होताच click व्हायला हव होतं खरंतर...पण इथेच काहीतरी miss झालं...
लग्न म्हणजे दोन जीवांच,दोन आत्म्यांच मिलन खरंतर पण स्वतःत गुरफटलेली ही दोघे कधीच एकमेकांना तेव्हढ समजून नाही घेऊ शकली..
स्वतःतून बाहेर आलं तर माणूस इतरांना समजून घेऊ शकतो ना...
कदाचित त्यांच्या जोडीदाराच्या अपेक्षा या त्यांच्यासारख्याच असामान्य असाव्यात..त्यामुळे ते एकमेकांच्या जवळ येऊ शकले पण नवरा-बायको म्हणून नाही....
जगासाठी नवरा-बायको असणं आणि मनाने नवरा-बायको मानणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे हे त्यांनाही हळू हळू जाणवू लागलं...
त्यांनी आपलं लग्न टिकावं म्हणून प्रयत्नही केले पण तरी ते व्यर्थच ठरले...
आणि मग शेवटी त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला..
अर्थात हे सगळं खूप पटपट नाहीच झालं..पण अपेक्षेपेक्षा थोडं लवकरच....

पण या सगळ्यात ते एकमेकांचे चांगले मित्र बनू शकले..प्रेमाची पहिली पायरी मैत्री हीच असते ना....
आज ही ते भेटतात..चांगले मित्र म्हणून..
काही नात्यांना नावं नसतात त्यातलंच एक यांचं नातं...
दोघांनी परत लग्न नाही केलं..
इतरांना दिसत नसलं तरी मनातल्या मनात माणूस बराच काही सोसत असतो म्हणूनही असेल कदाचित पण त्यांनी परत एकत्र यावं असले इतरांचे सल्ले सुद्धा त्यांनी धुडकावून लावले...
2 perfect व्यक्ती एकत्र असाव्यात असं देवालाही वाटतं नसावं कदाचित..
ही गोष्ट इथेच संपली...
सगळयाच गोष्टींना Happy Ending नसतो  'एका लग्नाची दुसरी गोष्ट' सारखा.








Wednesday 1 August 2012

कविता

अशांत मनाचा विश्वास आहेस तू.....
कित्येक मित्रांच्यामध्ये खास आहेस तू.......

जीवनात आहे मी कारण माझा श्वास आहेस तू.......
आभारी आहे मी तुझी कारण माझ्या आयुष्यात आहेस तू.......
 
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
संध्याकाळ झाली की मनाला एक अनामिक हुरहुर लागते..........
तुझा phone येईल याची आपोआप वाट पाहिली जाते......

pulser ची ride आणि चहाबरोबरच्या गप्पा आठवायला लागतात...........
आणि न बोलता घालवलेल्या संध्याकाळी आता खूप हव्याहव्याशा वाटतात.......
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
कसं आहे आपलं प्रेम.....आपल्या दोघांसारख.....
थोडंसं माझ्यासारख अन् खूपस तुझ्यासारख......

थोडंसं वेडं माझ्यासारख....अन् खूपस शहाण तुझ्यासारख......
थोडंसं अल्लड माझ्यासारख अन् खूपस समंजस तुझ्यासारख......

थोडंसं फिल्मी माझ्यासारख अन् भरपूर dialog म्हणणार तुझ्यासारख......
थोडंसं रडुबाई माझ्यासारख अन् अती हळव् तुझ्यासारख......

खूपस practical माझ्यासारख अन् too much romantic तुझ्यासारख......
जर लिहीत गेले तर कमी पडतील 3 वर्ष....
पण खरंच आपलं प्रेम आहे आपल्या दोघांसारख................
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
तू आहेस,होतास अन असशील ही..... म्हणून च मी बिनधास्त जगत असते …..

पण तू सोडून तर जाणार नाही या काळजी ने कधी कधी मन धास्तावते…..

मग असं वाटत की तुला पकडून ठेवावं….

हृदयाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवावं….

पण मग काय करशील तू ???

बंद मुठीतून वाळू सारखा अलगद झिरपून जाशील का तू????

का कोषातून बाहेर पडलेल्या फुलपाखरा सारखा उडुन जाशील तू????

का मागे न बघता निघून जाशील कधीच परत न येणाऱ्या वेळेसारखा???

का राहशील माझ्या हृदयात फक्त माझा बनून????

मला उत्तर माहितीये कदाचित…..

पण तरी मी वाट पाहतीये तुझ्या उत्तराची………….
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
तू लांब तरी मनाच्या इतका जवळ
की तुझ्या (imaginary)मिठीत असताना वाऱ्याचा स्पर्श ही नाही होत.....

तू लांब तरी मनाच्या इतका जवळ
की माझ्या सोबत तुझ्या पावलांचे ठसे बघून जमिनीला ही आश्चर्य वाटावं....

तू लांब तरी मनाच्या इतका जवळ
की आरश्यात माझ्या ऐवजी तुझ च प्रतिबिंब दिसावं....

तू लांब तरी मनाच्या इतका जवळ
की प्रत्येक गाणं ऐकताना तुझ्या गुणगुणन्याचा भास व्हावा......

तू लांब तरी मनाच्या इतका जवळ
की तुझ्या नुसत्या असण्याने सगळ काही उजळून निघावं......

तू लांब तरी इतका जवळ
की अस वाटत तुझा सहवास अनुभवण्यासाठी परत प्रेमात पडावं.......

ये लवकर
आता नाही सहन होत.....
  ---------------------------------------------------------------------------------------------------------------
 
ते मंतरलेले दिवस.....
त्या भारावून टाकणार्‍या गोष्टी.....
अन् आता
मनात साठून राहिलेल्या आठवणी...........

एकमेकांच्या डोळ्यात पाहिलेली स्वप्नं.......
हातात घेतलेला हात......
एकमेकांच्या प्रेमात बुडालेले क्षण......
सगळंच नाही शकत सांगू
या क्षणी .......
  ----------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक वेळा पाऊस कसा वेगळा वेगळा भासतो,
तुझ्या रूपात दर वेळी पाऊस नव्याने कळतो

तू सुद्धा पावसासारखा वागतोस लहरी,
तुझ्या मनातल्या गोष्टी मला कळतील का रे कधी??

पाऊस निदान शब्दामध्ये मांडता तरी येतो,
तुला मात्र माझ्यामध्ये बांधता येईल का रे कधी??

पाऊस यायच्या वेळेस मेघ चाहूल तरी देतात,
तू मात्र निघून जायची वेळ आली तरी कळू दिलं नाहीस कधी...

असं काय नातं आहे तुझं आणि पावसाचं
दर वेळेस मला कोड्यात पाडून निघून जाता दोघेही,
तो येईल याची खात्री असते तरी
पण तुझं काही सांगता येईल का कधी???
-----------------------------------------------------------------------------------------
अचानक हातातले हात सुटून जातात
जेव्हा काही माणसं आयुष्यातून निघून जातात तेव्हा मनाला चटका लावून जातात.....
जाता जाता मात्र मनात आठवणी आणि डोळ्यात पाणी देऊन जातात.....
------------------------------------------------------------------------------------------
तू च सगळं जग होतास एकेकाळी 
आता तू नसण्याची सवय करून घेतेय......
तुझं चालणं,बोलणं या सगळ्यांत मिसळून गेलेली मी.....
आता तू नसताना थोडी अडखळतेय.....

तू दिलेले क्षण आता आठवणी होऊन जातील...
पण तरी आपली स्वप्न विसरता नाही येतेय.....
ज्या धाग्यात बांधलं एकमेकांना...
त्याचा  गुंता हळू हळू सोडवतेय.....

तू म्हणजे वाट्टेल ते येऊन सांगायला दुसरं मन होतास रे माझं...
म्हणून च आता स्वतःच्या नजरेला नजर द्यायचं पण टाळतेय.....
पूर्वी सगळं तुझ्यापाशी सुरु होऊन तुझ्यापाशीच संपायचं...
आता तुझ्याविना स्वतःच अस्तित्व शोधतेय...

हळू हळू का होईना पण तुझ्यापासून दुरावतेय....
तुला विसरतेय...

---------------------------------------------------------------------------------------------------------
असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया

कधी उदास असू,तर कधी खुदकन  हसता येईल
हृदयामध्ये थोडी अशी जागा
जीवनाच्या वाटेवर दमलोच कधी,
तर तुझ्या सोबतीने बसता येईल

पण ज्या छळतील आपल्याला अशा
आठवणींचा गाव नको देऊया
असंच राहू देना आपलं नातं,
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया!!!!!

प्रेमात नेहमी दुःखच असते
मग कशाला त्या दुःखाच्या वाट्याला जाऊया
प्रेम आहे न दोघात हे फक्त
आपल्या नजरेला कळू देऊया

असंच राहू दे ना आपलं नातं
त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊया
आहोत ना एकमेकांसाठी खास
मग एकमेकांना घाव नको देऊया!!!!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिलीस तू  फुले , फुलले ऋतू त्यांच्यामध्ये 

दिलीस तू स्वप्ने , दिसले भविष्य त्यांच्यामध्ये 

दिलेस तू क्षण , उलगडल्या आठवणी त्यांच्यामध्ये 

दिलास तू श्वास , जुळले जीवन त्यांच्यामध्ये 

Sunday 29 April 2012

सगळं सुरळीत चालू असतानाच काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता असते



Are You Okay??? - इति बाबा.
हम्म.............तंद्रीतच त्यांच्या कडे बघून उत्तर दिलं मी.......

माझ्या मनात काय घालमेल चाललीये हे न कळून ते तसेच शेजारी बसून राहिले........
आणि  अचानक मी त्यांना म्हणलं  "मला पळून जावसं वाटतंय......I must call off the wedding".....
हे ऐकून च त्यांना घाम फुटला...........

सगळं नीट सुरळीत चालू असताना मी असं म्हणावं याचा त्यांना जबरदस्त धक्का बसला.......
आणि एका सुसंस्कृत घरात असं काही घडलं तर पुढे काय याचा विचार त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा नसेल केला......

आता मी पुढे अजून काय बोलणार याच  नजरेने त्यांनी माझ्या कडे पाहिलं.
पण मी काहीच न बोलता तशीच बसून होते......


खरंतर सगळं सुरळीत च चालू होतं.....
प्रेमविवाह  करत होते मी.....मी पसंत केलेला मनासारखा जोडीदार......
चार वर्षाच्या Strong Relationship मधून लग्नाकडे पाउल टाकलेलं........
घरून विरोध नव्हता......
होणाऱ्या  सासरी सुद्धा माझं कौतुक होत होतं..............
काहीच कमी नव्हतं......कशाचीच ददात नव्हती......


पण मग तरीसुद्धा असे विचार का यावेत माझ्या मनात???
मनात एक प्रकारची चलबिचल सुरु झालेली .......
कि खरंच सगळं सुरळीत चालू असतानाच काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता असते????
का यालाच म्हणतात "Pre-Wedding Jitters"????

love relationship चा सगळा  charm  गेल्यावर लग्न करतेय असंच वाटायला लागलं......
पाऊस  ओसरल्यावर रस्ते कसे कोरडे होऊ लागतात ना तसं मन कोरडं व्हायला लागल्याची भावना आली.......
मग ज्यात आपल्याला interest नाही त्यात दुसऱ्याच पण आयुष्य वाया घालवायाचं ? का एक अभद्र विचार म्हणून सोडून द्यायचा ? याचा विचार करायला लागले......

कधी कधी  मनात नुसती विचारांची गर्दी होते पण हवे ते प्रश्न काही केल्या सुटत नाहीत....
खरच नाही कळत मला काय करावं...

Friday 18 November 2011

आपलं ते.....

"मेहता प्रकाशन???? अगं ते फक्त भाषांतर केलेली पुस्तके प्रकाशित करतात......त्यापेक्षा आपली original मराठी पुस्तकं वाच....." इति माझे काका........
हे वाक्य त्यांनी उच्चाराव यावर माझा १ सेकंद विश्वास च बसेना.......
ज्या माणसाला साहित्यात इतका interest कि त्याच्या घरात १ अख्खी भिंत फक्त पुस्तकं ठेवलेली आहेत त्यांनी असं म्हणावं हे मला पटलच नाही.......

तसं बघायला गेलं तर इतर भाषांमध्येही तितकंच किंबहुना जास्तचं चांगलं लेखन केलेलं आढळतं.
 पण दुसऱ्याची कदर करू नये......'आपलं ते बाब्या दुसऱ्याच ते कार्ट' या चालीवर आपण कायम मराठी सोडून इतरांना तुच्छ लेखात आलोय.......

याचा अर्थ असं नाही कि माझं मराठी वर प्रेम नाही किंवा इतरांबद्दल मला जास्त पुळका आहे......
पण एकीकडे Globalization झालं म्हणायचं आणि दुसरीकडे असं वागायचं हे मला नाही पटतं..........

आपल्या मराठीत पु.ल.,व.पु. जितका सुंदर लिहितात तितकंच अप्रतिम झुंपा लाहिरी लिहितात.....
रत्नाकर  मतकरी त्यांच्या गूढ कथांमधून जसं खिळवून ठेवतात तशीच जादू अगाथाख्रिस्ती सुद्धा करतातच की.......

एवढंच काय शोभा डे स्वतः मराठी भाषिक असून सर्व लिखाण इंग्रजी मध्ये करतात........
याचा अर्थ त्या मराठी द्वेष्ट्या आहेत असं होत नाही.......


उलट इतर भाषेतील लेखन वाचल्याने विचारांची कशा रुंदावते असा माझा समज आहे.........
त्यामुळे  सर्व प्रकारच्या लेखनाची गोडी लागते किंवा लागलीये असं म्हणायला हरकत नाही..........

Friday 4 November 2011

उगाच......कशात काही नसताना........

आज खूप बोलावसं वाटतंय तुझ्याशी.....
तुला वाटेल चला आज मी सांगणार काहीतरी......काहीतरी खास.....माझ्या मनातलं.....
अर्थात ते बरोबर च आहे.......कारण तू म्हणतोस तस मी कधीच व्यक्त होतं नाही.....स्वताहून.........
कोणतीही गोष्ट सांगत नाही.......खास तुझ्या शैलीत सांगायचं झालचं तर "हातचं राखून सांगते".....

पण मला आज काहीतरी वेगळ सांगायचंय तुला......तुझ्याजवळ सगळं सांगितलं कि खूप मोकळं वाटतं म्हणून च सांगतीये.....

इतक्या वर्षात माझ पुस्तकावेड यावर कधीच बोललो नाही आपण............फक्त मला पुस्तकं वाचायला आवडतात एवढचं तुला माहितीये......
पण त्यातही गूढकथा वाचायला जास्त आवडतात हे तुला मी  कधीच नाही सांगितलं......
गूढकथा वाचताना कसं मनाला एक वेगळं रूप चढत........आणि म्हणूनच अधाश्यासारखी वाचते मी त्या......
वाचता वाचता मनातल्या मनात त्यातल्या प्रत्येक गोष्टीशी माझी real life जुळवू पाहते.......
कित्येक गोष्टीत नवऱ्याने बायको ला वेड केलेलं.................दुसऱ्या बाईच्या नादाने तिला mentally unstable ठरवलेलं.......असा बरचसं काहीबाही......

या सगळ्या गोष्टींचा इतका पगडा मनावर आहे की कधी कधी वाटतं आपल्याबरोबर सुद्धा असा काही घडणार नाही ना???
कशावरून ह्यातली एखादी घटना माझ्या आयुष्यात नाही घडणार???
खरतर तू इतका प्रेम करतोस माझ्यावर,आज पर्यंत इतका दिलंयस मला भरभरून.......
आणि आता त्या प्रेमावर शंका घेणं बरोबर नाही हे मान्य..........
पण वाचलेल्या अनेक घटनांची भूत माझ्या मानगुटीवर बसतात..........कधी कधी चक्क पाठलाग करतात माझा........

आता भूत हा शब्द ऐकून च हसत सुटशील हे माहितीये मला....
म्हणशील तू एवढी शूर कि भूतांना पळवून लावशील,आणि तूच त्यांना घाबरतेस.....हे शक्य नाही.............
पण खरं सांगायचं तर कधी कधी अंधारात किंवा सावलीत सुद्धा त्या कथांमधली माणसं दिसायला लागतात........
कधी एकट बसलं कि स्वतःचे श्वास गरम झाल्याचे जाणवू लागतात......

मला माहितीये तू हे वाचलसं तर हसण्यावारी नेशील......म्हणशील खूप विचार करतेस ना म्हणून असं होतं......
स्वताःच्या दुखऱ्या डोक्याला त्रास करून घ्यायची सवय च आहे तुला असं म्हणशील.......
पण कधी कधी वाटत की खरंच सर्दीचा काय संबंध....विचार  करून च डोकं दुखत असेल माझं......
                                                                                                                                                                  
खरं तसं बघायला गेलं तर काहीच संबंध नाही माझा कोणत्याच कथेशी वा त्यांच्या लेखकांशी........
तरी सुद्धा त्या गोष्टी छळतात मला.............का???काय माहित??

आत्ता एवढं बोलूनसुद्धा मनातली जळमटं साफ नाहीच झालेली.......तरीपण बरं वाटेल म्हणून केलेला हा प्रयत्न............
उगाच......कशात काही नसताना........

Monday 26 September 2011

तिढा

खूप चीडचीड होतीये..........काय चूक झाली माझी????प्रत्येक वेळेस का असं व्हावं??????
काय  केलं की आयुष्य सरळमार्गी जगता येईल??
मला  वाटलं आणि गेले मी पिक्चर बघायला..........
काय चुकलं यात?
एवढंच कि त्याला न विचारता माझ्या खूप जवळच्या मित्रा बरोबर गेले........
पण  तो इथे असता तर हा प्रश्न च नसता आला..........कारण जेव्हा तो इथे असतो तेव्हा मी फक्त त्याची असते.......फक्त त्याच्या बरोबर असते.....
पण या असण्याचा सुद्धा त्याने वेगळा अर्थ घेतला......
त्याच  असं म्हणणं पडलं कि तो असताना मी फक्त त्याला भेटते आणि इतरवेळा त्याच्या पाठीमागे इतर लोकांना भेटते ही एक प्रकारची फसवणूकच आहे...........

माझा होणारा नवरा असला तरी त्याने मला एवढं सुद्धा समजून घेऊ नये?
मी  एकविसाव्या शतकात वाढलेली एक मुलगी आहे.......मला पण मित्र आहेत.....किंबहुना मित्र च जास्त आहेत.....कारण माझ खूप चांगलं पटत त्यांच्याशी......
पण  मी कोणाबरोबरही, कोणत्याही मित्राबरोबर बोलू नये असं त्याला वाटतं..........
का मला मित्र च असू नयेत?
खरंतर  गेले ४ वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो.......अगदी आतून-बाहेरून .....
आम्हाला एकमेकांबरोबर राह्यला आवडतं.........आम्ही अख्ख आयुष्य एकत्र काढायचं ठरवलंय........

पण  या  सगळ्याचा मला त्रास होतो......कितीही पटवून घ्यायचं म्हणलं तरी त्रास हा होतोच........
मी  त्याच्या मनाविरुद्ध वागले तर त्याला त्रास होतो.....आणि मग भांडण होतात........

आणि त्याच्या मनासारख वागलं तर माझा श्वास घुसमटतो......

दरवेळी तीच आश्वासन देणं........कोणाशी न बोलण्याची शपथ घेणं........आणि मग काय पुढे?
थोड्या दिवसांनी त्याने स्वतःहून मला बोलायला भाग पाडणं.......
आणि मग परत  रे माझ्या मागल्या...........

कधीच कळत नाही कसा सोडवू हा तिढा????













Tuesday 20 September 2011

पाऊस- मला भावलेला



ऑफिस सुटून घरी यायला निघालेले...............
नुकताच पाऊस पडून गेलेला..........आकाश हलकं हलकं झालेलं..............
'आसमानी रंग है,आसमानी आंखो का' या गाण्यातल्या ओळी आठवू लागल्या..............
इतका सुरेख निळा रंग आणि तेवढ्याच सुरेख संधी प्रकाशाच्या छटा...........

पाऊस येणार म्हटलं कि मनाला हुरहूर लागते......चातकासारखी त्याची वाट पहिली जाते.......
त्याची सगळी रूपं आठवू लागतात.............
त्याचं रिमझिम बरसणं तरी कधी धांदल उडवणं...................
कधी उधाणता तर कधी निमूटपणे कोसळणं.............
कधी अल्लड मुलासारखं चिंब भिजवणं तर कधी अलगद येऊन मिठीत घेणं...........

आणि पावसाबरोबर आपोआप येतात त्या आठवणी...............
आठवू लागतात ती माणसं...............
काही खूप जवळची तर काही लांब असून सुद्धा मनाच्या जवळ असणारी.............

आठवू लागतात ते क्षण..................
पावसातली long ride आणि वाफाळत्या चहा बरोबरच्या हळव्या गप्पा...............

खिडकीतून पाऊस बघताना आठवतात ते बासरीचे सूर....................
आठवते ती सलील-संदीप यांची 'पाऊस असा रुणझुणला.......' ही कविता.................
आणि हवेतल्या गारव्यात मिळून गेलेला मारवा...........