Thursday, 31 January 2013

अपेक्षा(!)(?)

नावीन्या मधलं अप्रूप संपलं कि सुरु होतात त्या अपेक्षा आणि मग त्याचं ओझं होत राहत मनावर..
कधी कधी जात च नाही ते..
म्हणजे पागोळीत पाणी साठून राहावं न तसं एकदम...
नक्की कशा असतात या अपेक्षा?
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या एकमेकांकडून अपेक्षा असतात तश्या?
का नुकतच मूल शाळेत गेल्यावर पालकांच्या त्याच्याकडून च्या अपेक्षा वाढतात तसल्या?

मी लिहिता लिहिता हसले एकदम..कानात ऐकु येणाऱ्या गाण्यातून जसं उत्तरं च मिळालेलं...
तुझ्यापेक्षा माझ्या स्वतःकडून च जास्त अपेक्षा आहे अशा अर्थाच गात होता तो गायक...
आणि मग कळलं या अपेक्षा म्हणजे दुसर काहीच नसून स्वतःच्या वागण्याच केलेलं एका अर्थी परीक्षण  च आहे.
मग दुसऱ्याकडून अपेक्षा करताना स्वतःच्या वागण्याच समर्थन करतो का आपण?
का आपल्यापुरता तो प्रश्न सोडवून मोकळं झालेलो असतो?
मोकळं होता येत का मुळातच ?
का एका अपेक्षेतून दुसरी अपेक्षा वाढते?सतत चांगलं वागायची,बोलायची,करायची ??
आणि नेहमी चांगल्याचीच अपेक्षा का ?वाईटाची का नाही ?
इतके प्रश्न नेहमीच पडतात मला...आणि गुंता वाढत जातो..
म्हणजे स्वतःकडून गुंता सोडवायची अपेक्षा करताना तो गुंता अजून वाढवत जाते मी आणि अर्थात च अपेक्षा सुद्धा...

आणि विचार करता करता माझ्या माझ्याकडून जितक्या अपेक्षा असतील तितक्याच इतरांच्याही असतील म्हणून त्याचा हि विचार करत राहते...
काय असतील इतरांच्या अपेक्षा?
आई-बाबांच्या असतील कि हिने अजून शिकावं किंवा चांगली नोकरी करावी,आणि लग्न करून चांगला संसार करावा..म्हणजे चारचौघींकडून असतील तश्याच अपेक्षा..
मित्र-मैत्रिणींच्या काय असतील तर अजून कित्येक वर्ष हि मैत्री जपावी..
आणि अजून जगातल्या कोणा न कोणाकडून काही न काहीतरी अपेक्षा असतील च कि माझ्याकडून...
मग त्या पूर्ण करतेय का मी वेळच्या वेळी?
कधी संपतात का आणि या अपेक्षा?का दर वेळी वाढत च जातात?
आणि या सगळ्याबरोबर च माझ्या स्वतःकडून च्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतायत का?
निदान कळल्यात का मला कि माझ्याकडून काय अपेक्षा आहेत ते?
का नुसतंच अपेक्षांपेक्षा विचारांचं ओझं तयार झालंय मनावर ?